कधी काहीही न बोलता बोलावेसे वाटते, चाल तीच ठेऊन शब्द बदलावेसे वाटते, शब्दांचे घेर घेरतात मग चौफेर, नि:शब्द होऊन गगनात उडावेसे वाटते.....

Friday, December 31, 2010

२०११-नवी आव्हानं???

३१ डिसेंबर.
सरत्या वर्षाचा शेवट आणि इंग्लिश वर्षाची सुरुवात.२०१० हे वर्ष तसं तर मोठमोठ्या आर्थिक उलाढालीचं आणि राजकीय घोटाळ्याचं.काहीशी चांगली कामगिरी वगळता देशातील परिस्थिती एकंदरीतच असंतोषाची.सामान्य माणसावर पडणारा महागाईचा ताण आणि नेते लोकांचा मात्र "आदर्शवाद".कुणी क्रिकेटमध्ये गुंतलेले तर कुणी राष्ट्रीय खेळातील मैदानावरीलच माती खाणारे.देशाच्या रथाची दोर यांच्या हातात पण त्यांनी ती दोर आपल्या घराच्या अंगणात बांधून विदेशवारी करण्यातच निपुण्य मिळवलंय.ज्या मंडळींवर देश चालवण्याची जबाबदारी आहे तेच लोकं देशाला पोखरायला निघालेय.सामान्य माणसाला त्याचं घरंच नीट चालवता येत नाही त्यात देशाचं काय?
महागाईचा भस्मासुर एवढा वाढतोय की त्याला आवरायला पुन: भगवंताला प्रकट रुपात पृथ्वीवर यावे लागेल असे वाटते कारण ते काही या सत्ताधारी मानवांचे काम दिसत नाही.असो.जोपर्यंत राजकारणी लोकं हव्यासापोटी जगणं सोडणार नाही तोवर सामान्य माणसांचे हाल निश्चित आहे.

२०१०.व्यक्तिगतरीत्या मागे वळून पाहताना भरपूर अश्या गोष्टी किंबहुना घडामोडी आहेत ज्या पुन: आयुष्यात घडाव्यात असे काही वाटत नाही.काहीश्या गोड, काहीश्या आंबट आणि काही काही तर तुरटही अश्या गोष्टी आणि अनुभव प्रामुख्याने या सरत्या वर्षात बघायला मिळाल्या.त्याच गोष्टींच्या काही आठवणी तर काही साठवणी मनात कुठेतरी रुजून असतात.हे तर जीवनात येत-जात राहतातच पण २०१० मध्ये जरा जास्तच होत्या.

२०११.नवीन वर्ष म्हटलं की नवी आव्हानं.त्या आव्हानांना पेलण्यासाठी पुन: नव्याने बांधणी,नवी तडजोड आणि त्यातच "माझे रिझोल्युशन" हे प्रत्येकाच्याच मनात असलेलं काहीतरी गुपित असतं.मी नेहमी काहीतरी रिझोल्युशन ठरवतो पण परिस्थिती नेहमीच त्याच्या विरुद्ध असते.त्याकारणाने माझे रिझोल्युशन हे दरवर्षी मोडीतच येतं.बघूया या वर्षी काय होतं ते.

हे वर्ष निदान माझ्यासाठी तरी काही सोन्याचं नव्हतं राव.परमेश्वर करो की येणारं वर्ष माझ्यासाठीच नव्हे तर प्रत्येक जीविताच्या आयुष्यात सुख-समाधानाची भरभराट घेऊन येवो.सर्व रसिक प्रेक्षकांना नव-वर्षाच्या हार्दिक शुबेच्छा...............!!!

Friday, December 3, 2010

रंगमंच

आज लेखणीतील शाई संपली आहे,

दरवेळेचं नाटक आहे.

टायपिंगचा कंटाळा आल्यावर जर काही लिहायला गेलं

तर नेमकी शाई नाही.

आता काय लिहिणार कपाळ........

मनातील जे भाव आज कागदावर उतरवायचे होते

ते मनातच राहून गेले.

पुन्हा गुंतले ते आत,आणखी आत.

कधी पुन्हा इच्छा होईल,

कधी हातात लेखणी येईल

आणि आलीच तर त्यात शाई राहणार की नाही,

हे आगाऊचे प्रश्न निर्माण झाले.

रंगमंचावर सुद्धा कधी कधी असेच होते.

शाई भरलेला कागद मनात असतो.

शाईने रंगलेल्या शब्दांना आपल्या भावनेने सजवून

प्रेक्षकांपुढे त्याचे सादरीकरण करायचे असते.

पण कधीतरी हे सादरीकरण भावनाविरहित होते

कारण मनातील शब्दांची अन त्या शाईने रंगलेल्या शब्दांची

गट्टीच जमत नाही.

मनाच्या शाईचा रंग अन शब्दांच्या शाईचे मिश्रण होत नाही.

शब्दांच्या तारेवर कसरत करणे म्हणजे रंगमंच नव्हे,

ती कसरत हजारो लोकांच्या देखत दिमाखात सादर करणे

हे खऱ्या प्रतिभावंताचे काम होय.

आज मीच रंगमंच गाजवणार,

सूर्यासारखा मीच तळपणार,

याच ध्येयाने रंगमचावर ओठांतून जणू शाईचे सडे सांडतात.

तेच सडे कुणी ओंजळीत घेत माथी लावतात

तर कुणी पायाखाली तुडवून निघून जातात.....................!!!


Sunday, November 21, 2010

भेटीचे प्रेमांतर................!!!


प्रेमात पहिल्यांदाच पडल्यावर प्रत्येकाला त्याची प्रेयसी निदान ऐश्वर्या राय पेक्षा तरी किंचित जास्तच सुंदर वाटते.तिला इम्प्रेस करण्यासाठी त्याची वाटेल ते करण्याची तयारी असते.मग तो कधी तिची तुलना आकाशातील तारकांशी करतो तर कधी उगवत्या गुलाबाशी.तिलासुद्धा आपल्याला ह्याच्यासारखा जोडीदार लाभला याचा मनोनीत आनंद होऊ लागतो. आमच्या नायकाचे सुद्धा असेच झाले राव.........
साधारण काही दिवस प्रेमाचे लव्हाळे असेच चालू असतात.म्हणतात ना नव्याची नवलाई चार दिवस.तेच होतं.मग त्याला तिला रोज-रोज भेटणं आवडत नाही.तिच्या ड्रेस घालण्यावर तो उगाच काहीतरी कॉमेंट्स देतो.आजकाल हा आपल्याला भेटायचे टाळतो आहे हे तिच्याही लक्षात येतं.तू आता पहिलेसारखा नाही राहिलास मुळी.तिचा नाराजीचा सूर उगवतो.दोघंही नाराज होऊन निघून जातात............
पण म्हणतात ना खऱ्या प्रेमाची अनुभूती ही दूर राहिल्यानंतरच होते.मग बऱ्याच दिवसांनी भेटण्याचे ठरते.ती भेट पहिल्या भेटीहूनही अधिक रोमांचक वाटत असते.मग पुनः नव्याने भेटणे,नाराजी दूर करून राजी होणे हे फेरबदल मुख्य रूपाने होतात.आणि त्या भेटीचे रुपांतर पुनः प्रेमात होऊन जाते.
त्या भेटीच्या प्रेमांतराचा संवाद जणू कवितेच्या स्वरुपातच होतो...........


छान एका बागेत भेटण्याचे ठरले.

मी उशीरा आल्याने तिने दुरूनच पाहता

नाक मुरडले.

जीन्स,टी-शर्ट नेहमी घालणारी ती

आज चक्क सलवार घालून आली होती

बघून तिला मनात माझ्या प्रेमाची बासरी वाजत होती

अरे वा! तुमचे वाहन आज वेळेवर आले

तू कुठे गेला होतास?रागातच तिने विचारले


आल्या आल्या प्रश्न काय विचारते तूर्तास

कुठे काय? तुलाच आलो भेटण्यास

चल बसुया आत

भलताच दिसतोय
आज वेगात

तिने मुद्दाम तिची ओढणी माझ्या

डोळ्यावर भिरकावत विचारले......

तुला दिसत नाही आज काही वेगळेपण?

हो जरा जास्तच रमणीय आहे वातावरण

असा कसा रे तू अनरोमांटिक

अगं बाजूच्या बाकावर बसलेली मुलगी आहे फंटास्टिक

रागाने उठून गेली ती तरातरा

मीही तिच्या मागे गेलो भराभरा

हातात घेउनी तिचा हात

म्हणालो खूप सुंदर दिसतेय तू आज

कसला चढलाय तुझ्या रुपाला साज

बदललेला दिसतोय तुझा मिजाझ......

आवडते मला तुझे रागावणे

काहीतरी नवीन सांग हे तर रोजचेच रडगाणे

नवं काही करायला गेलं तर तुझे नेहमीचेच बहाणे

देशील का मला माझे हवे ते मागणे

काय हवं आहे तुम्हाला मि.शहाणे

मला हवे आहे तुझ्या ओठांचे तराणे

गायचेय आज तुझ्या हृदयातील गाणे

हवा आहे तुझा मखमली स्पर्श

वातावरणात बहरू दे अपुल्या भेटीचा हर्ष

लाजलाजूनी चूर होऊन ती दूर पळाली

तिच्या लाजण्याने मला नवी चाहूल मिळाली

चटकन तिच्या गालावर लाजेची खळी खुलली

रुसलेली माझी सखी प्रीतीच्या गुलाबाने पुन्हा फुलली.


Wednesday, November 17, 2010

अनुभूती




रूप तुझे मोहक जागवी मज रात-राती
लोचनास भासे तुझ्या स्पर्शाची अनुभूती

मोरपंखी कुंतलात मन वेडे गुंतत जाई
कासावीस होऊन जीव शरण तुलाच येई

सांगशी कधी तू मज गुपित भावनांचे
का सहावे सदा पापण्यांनी भार आसवांचे

अलवार बोल सखे व्हायचा हा स्वप्नभंग
अलगद उडून जाती फुलावरी जसा पतंग

संभ्रमात मन माझे वेचिते अनंत रंग
जाणशी कधी प्रिये हृदयातील जलतरंग

तुजविण व्यर्थ आहे जगणे या जीवा
ठेवशी जपून का अपुल्या प्रीतीचा ठेवा

Friday, November 12, 2010

प्रेम



प्रेम आहे माझ्यावर
हे कधी बोलत नाही
दुसऱ्या मुलीशी बोललेलं
तुला चालत नाही

तुझ्या ह्या मौनाचा
अर्थ काय समजावा
प्रेमाचा रथ अपुल्या
मार्गी कधी लावावा

पाणावलेल्या डोळ्यात
नक्कीच काहीतरी दडलंय
मनात इकडे माझ्या
प्रीतीचं पाखरू फुलतंय

तुझ्या डोळ्यांची भाषा
मजला कळत नाही
प्रेम करतेस माझ्यावर
हे मला वळत नाही

Tuesday, November 2, 2010

दिवाळी













सौजन्य:holidaywallpapers.blogspot.com

अजि सोनियाचा दीनु
वर्षे अमृताचा घनु ............!!

वरद हा दैवाचा
ऋतू मांगल्याचा
क्षण पावित्र्याचा
सण दिवाळीचा !!

संपूर्ण रसिकांना दिवाळीच्या पोट भरून शुभेच्छा.
हीच नव्हे तर येणारी प्रत्येक दिवाळी तुमच्या आयुष्यात
सुख-समृद्धीची भरभराट घेऊन येवो,अशीच परमेश्वरचरणी इच्छा........















Monday, November 1, 2010

प्रणय


रात आली पुनवेची
चंद्र होता जवळ
ओठ तिचे थरथरले
इच्छा माझी प्रबळ

मोरपंखी स्पर्श
तिच्या कुंतलांचा
चहूकडे दरवळे
हर्ष या मनाचा

गार गार हवेत
ती माझ्या कवेत
कंप तिच्या शरीराचा
बहर आला यौवनाचा

अविरत भावना
अन खट्याळ मन
दाटलेला कंठ माझा
मखमली तिचे तन

अर्धोन्मिलीत नेत्र
उचंबळत्या लाटा
अनिमिष अंगाने मग
एकत्रित आल्या वाटा

क्षितिजावरती चैतन्याचा
नवा मार्ग खुलला
मिलनाने जीवनी अपुल्या
जणु मोगरा फुलला........................