कधी काहीही न बोलता बोलावेसे वाटते, चाल तीच ठेऊन शब्द बदलावेसे वाटते, शब्दांचे घेर घेरतात मग चौफेर, नि:शब्द होऊन गगनात उडावेसे वाटते.....

Wednesday, October 27, 2010

निसर्ग

सडे सांडले किरणांचे
वरुणालाही जाग आली
मेघ गडगडले सारे
इंद्रधनुला साज आली

निसर्ग आला बहरून
कोकिळेची तान आली
काहुरल्या अतृप्त जीवा
तृप्त करण्या गंगा आली

फुलं-पाने उधळून न्हाले
रानवाटचे फुलोरे झाले
निर्मळ झाले क्षण सारे
गार वाहती आज वारे

संध्या ही फुलली प्रेमाने
आलिया नित्य नेमाने
शमले आता जीव सारे
भीती कसली रातीची रे

क्षितिजावरती किरणांचा
ओझरला रंग आता
चिमण्यांनीही धरल्या
अपुल्या घरच्या वाटा

तारका जाग्या झाल्या
चंद्रालाही जाग आली
निस्तेज होऊन सूर्याने मग
सोडली ती लाल लाली

पावसाळा

पावसाळा.
पावसाळा म्हटला की चिंब ओलं होऊन निसर्गातील या अप्रतिम ऋतुचा आनंद घेण्याची मजा प्रत्येकाच्याच मनी असते.पाऊस म्हणजे मनातील मरगळ धुऊन निघण्याची एक प्रक्रियाच होय.पाऊस आला की नद्या,नाले तलावं ओसंडून वाहतात.पावसाच्या त्या सरी अंगावर घेताना फारच रोमांच वाटतो.सर्वत्र हिरवेगार सदाबहार वातावरण असते.असा हा पावसाळा लहानांपासून तर चक्क आजी-आजोबांसारख्या बड्या मंडळीनासुद्धा हवाहवासा वाटतो.अश्या या सुख समाधान आणणाऱ्या पावसाळ्यातील एक चित्तथरारक प्रसंग माझ्या आजही स्मरणात आहे.

संध्याकाळी ८-८:१५ च्या सुमारास मी ऑफिसमधून निघालो.थोडा दूरवर जाताच पावसाने हजेरी लावली.मी एका बंद दुकानाच्या छपराखाली विसावा घेतला.पाऊस धो-धो बरसत होता.जवळ जवळ २०-२५ मिनिटे झाली,पाऊस कधी कमी होईल याचा मी विचार करीतच होतो की एका लहान मुलाने मला हात लाऊन माझे लक्ष वेधले.तो संपूर्ण भिजला होता.केस वाढलेले आणि फाटके कपडे घातलेल्या त्याने माझ्याकडे पैशाची मागणी केली.मी लगेचच दुर्लक्ष केले.पण तो तरीही त्याच्या पोटाकडे हात दाखवून पैसे मागत होता.मी त्याच्याकडे बघितले.तो संपूर्ण भिजला होता.त्याच्या टपोऱ्या पाणावलेल्या डोळ्यांमध्ये एक विलक्षण ओढ होती.मी नकळतच खिशात हात घातला आणि एक पाच रुपयाचं नाण त्याला दिलं.तसाच तो धावत पळत सुटला.रिमझिमणाऱ्या पावसात ,रस्त्यावरील दिव्यांच्या लुकलुकणाऱ्या प्रकाशात तो दिसेनासा झाला.तोवर पाऊस कमी झाला होता,मला निघायला हरकत नव्हती.

साधारण १० मिनिटाचे अंतर मी पार केले.पुढे रस्त्यावर प्रचंड गर्दी दिसली.कुणी पोलिसांच्या नावे तर कुणी दवाखाना या नावाने ओरडत होते.उत्साहापोटी मीसुद्धा त्या घोळक्यामध्ये शिरलो.गर्दीतून वाट शोधत मी काहीतरी समोर दिसते काय म्हणून पुढे गेलो,तसाच मी स्तब्ध राहिलो.एक क्षण डोळ्यासमोर काळोख झाला आणि चटकन माझ्या डोळ्यांत अश्रू आले.

ज्या लहान मुलाला मी पैसे दिले होते त्याला अपघात घडला होता.एका भरधाव येण्याऱ्या वाहनाने त्याला चिरडले होते.तो जागीच ठार झाला होता.त्याचा
छिन्न-विछिन्न देह बघून यमालासुद्धा रडू कोसळले असेल.त्या क्षणी मला अपराध्यासारखे वाटत होते.मी त्याला पैसे दिले नसते तर तो धावला नसता आणि हा प्रसंग घडलाच नसता,असे मनोमनी वाटू लागले.

नेहमीच हसत-खेळत बरसणारा पाऊस सगळ्यांना सुख समृद्धी देऊन जातो पण त्याचबरोबर मला त्या अविस्मरणीय प्रसंगाची आठवण देऊन जातो.त्या मुलाचे पाणावलेले डोळे आजही मला आठवतात.ते जणु माझ्याकडे न्याय मागत आहे असा मला भास होतो.त्या वेळी पावसाची प्रत्येक सर माझ्या अंगाला बोचत असते आणि त्या सरी मी कुठेतरी अपराधी आहे अशी जणु ग्वाही देत असतात.

जीवनसृष्ठीसाठी वरदान असलेला पाऊस दरवर्षी ठरल्याप्रमाणे येतो पण जाताना मात्र थोडे पाणी आसवांच्या रुपात माझ्या डोळ्यांमध्ये सोडून जातो.

Tuesday, October 26, 2010

मुलाखत

१९ मार्च,
माझ्या मुलाखतीचा ठरलेला दिवस.एका नामांकीत कंपनीमध्ये माझी मुलाखत होती.सकाळी १० वाजताच्या सुमारास मी तेथे पोहोचलो.साधारण ८-१० मुले-मुली होती.दोन तासानंतर माझा नंबर आला.चांगल्या मोठ्या कंपनीमध्ये मुलाखत देण्याची तशी ही माझी पहिलीच वेळ,त्यामुळे थोडा गोंधळलो होतोच.मुलाखतीसाठी मी आत प्रवेश केला, तोच मी स्तब्ध राहिलो.मुलाखत घेणाऱ्या दोन व्यक्ती होत्या आणि त्या दोघांमधील एक"ती" होती..............................

तिच्यासोबत मी माझ्या आयुष्यातील अविस्मरणिय क्षण अनुभवले होते.तिने एक नजर माझ्याकडे बघितले,तिचे डोळे पाणावले.माझाही श्वास दाटून आला.एका क्षणी असे वाटले की,आल्या पाऊली माघारी निघून जावे पण मी तसे करू शकलो नाही.साधारण १५-२० मिनिटांनी मी बाहेर आलो.खूप हताश झालेलो होतो.तिने मला एकही प्रश्न विचारला नव्हता,बहुदा मला बघून तिला बोलणे जमले नसावे.त्या दिवशी त्या सगळ्या आठवणी उफाळून आल्या ज्या मि मागील वर्षापासून विसरण्याचा प्रयत्न करीत होतो.

मी एफ.वाय. ला असताना ती मला भेटली.म्हणजेच दिसली.दोन महिने तिला बघण्यातच गेले.फक्त नेत्रसुख घ्यायचं आणि शांत बसायचं हाच दिनक्रम.काही दिवसांनी आम्ही बोलायला लागलो.मग नियमितच अभ्यासाबद्दल तर ट्युशनबद्दल बोलणं व्हायचं.मग पुढे आम्ही एक-मेकांच्या घरी येऊ-जाऊ लागलो.परीक्षा संपल्या.घरी तिच्या येण्या-जाण्यातून जवळीक वाढली आणि आम्ही प्रेमात पडलो.मग बाहेर फिरणे,पिक्चरला जाणे अश्या नवनवीन कारणांनी भेटणे व्हायचेच.जवळजवळ तीन वर्षे आमचे प्रेम असेच चालले.

अचानक एके दिवशी तिच्या घरी सगळं कळलं,नेहमीप्रमाणेच घरच्यांना आमच्या नात्याला विरोध होता.तिनेसुद्धा त्यांची मनबदलवणी करण्याचा प्रयत्न केला पण सगळं व्यर्थ.तिने मला भेटणे सोडले.तिच्या मैत्रिणीच्या हाताने एक शेवटचं पत्र हाती पडलं.पत्रात फक्तं दोनच वाक्य लिहिले होते.

"सगळं काही विसरून जा मी तुला विसरू शकणार नाही,मी हे सगळं माझ्या घरच्यांसाठी करते आहे.मला माफ कर.....................तुझीच "

बस्स.सगळं संपलं.

३१ ऑगस्ट.
मागील वर्षी तिचं लग्न झालं आणि आज एवढ्या दिवसांनी पुन्हा तिची भेट झाली.सगळं काही एक स्वप्नं म्हणूनच पुढे आलं.

दोनच दिवसांनी मला नोकरीवर रुजू होण्याचं पत्र मिळालं.मला कळून चुकलं होतं की,हे पत्र मला नक्कीच तिच्यामुळे मिळालं होतं.कारण मी मुलाखतीमध्ये एकही शब्द बोललेलो नव्हतो.पुन्हा एकदा मला तिच्या प्रेमाचा साक्ष्त्कार झाला होता.ती माझ्याजवळच आहे ह्याची मला जाणीव झाली होती,पण ते पत्र मी न स्वीकारण्यातच तिचं आणि माझं हीत समजलं..........................

Monday, October 25, 2010

प्रश्न


मनी तुझे स्मरण होतांना अशी अवचित येशील का?
आसुसलेल्या नयनांना माझ्या ओझरते दर्शन देशील का?

तुझ्याच वेड्या धुंदीत मी रात राती जागतांना
स्वप्नात हळूच येऊन मोत्यासारख शिंपल्यात दडशील का?
मनी तुझे स्मरण होतांना अशी अवचित येशील का?

आकंठ बुडालो तुझ्या प्रेमात मी,प्रीतीचा सहारा देशील का?
तुजसाठी कासावीस झालेल्या मनास क्षणभर विंसावा देशील का?
मनी तुझे स्मरण होतांना अशी अवचित येशील का?

तुझ्या स्पर्शाने काहुरल्या जिवा,भेटीने तृप्त करशील का?
लाजलाजूनी चूर होतांना हळूच मजला दिसशील का?
मनी तुझे स्मरण होतांना अशी अवचित येशील का?

इंद्रधनुचे सातही रंग तुझ्या सहवासाने उधळशील का?
पुन्हा एकदा तेच बंध जीवनात बहरवशील का?
मनी तुझे स्मरण होतांना अशी अवचित येशील का?

प्रश्न असे अनेक आहेत उत्तरे कधी देशील का?
नात्यांच्या विखुरल्या माळेला त्याच नात्याने माळ्शील का?
आपलेच ओठ आणि आपलेच श्वास सुरास देशील का?
मनी तुझे स्मरण होताना अशी अवचित येशील का?
आसुसलेल्या नयनांना माझ्या ओझरते दर्शन देशील का?

जगावेगळी


ती येते अन जाते
पण तिच्या येण्यात आणि जाण्यात काहीतरी वेगळीच मजा असते
तिच्या न येण्याने रुसलेलं मन आणि तिच्या येण्याने फुललेलं मन
यांची अवस्था काही वेगळीच असते
तिच्याकडे पाहीले कि पाहातच राहावे,
पण तिच्या नजरेतील देण वेगळंच असतं
तिच्या बोलण्याने हसून हसून खिदळून जातो मी,
तिच्या ओठांवरील स्मित हास्य काही वेगळंच असतं
आकाशातील तारे तोडून द्यावे तिच्या ओंजळीत ,
पण तिचं लुकलुकण काही वेगळंच असतं
मी रुसल्यावर तिचं मनवण,
रागावर मिश्कील हसण काही वेगळंच असतं
मी बोलत राहतो तिच्याशी भराभरा,
तिच्या मौनाचं कारण काही वेगळंच असतं
मी होय म्हणत असताना,
तिच्या मनातील होकार पण ओठांवरील नकार वेगळाच असतो
ती सोबत नसतानाही असल्याचा मनातील भाव काही वेगळाच असतो
तिच्या विरहामधेही तिलाच शोधण काहीसं वेगळंच असतं..............
वेगळ म्हणता म्हणता सगळं काही सारखंच असतं
शुण्यातून जीवनात अन जीवनातुन पुन्हा शुण्यातच जायचं असतं
आठवणीचे घेर घेरतात मग चौफेर
त्या चक्रव्युव्हाला तोडण शिकायचंच असतं
वेगळ म्हणता म्हणता सगळं काही सारखंच असतं...................

निरोप


खचलो मी,संपलो मी
शेवटचा श्वास घेतला
मृत्युशय्येत झोकुन स्वत:ला
शरीराने हा साथ सोडला................

निघाली मिरवणूक माझ्या प्रेताची
फुलं,पाकळ्या उधळीत होत्या
अश्रुंच्या जागी डोळ्यांत त्यांच्या
आनंद जणु ओसंडत होता................

हाताचे खांदे अनेक होते
साथ देणारा हात नव्हता
तुटली सारी नाती-गोती
ते जपणारा बंध नव्हता...............

रामनाम तेच होते आज
अर्थ मात्र वेगळा होता
ज्या लोकांसि भेटण्या झुरलो
अंती समुदाय तो सगळा होता..................

येता जवळ स्मशान भूमि
पाय माझे थरथरले
पेटविता शव माझे
मन मुक्तांगाने बहरले..................

अंत आहे येता मरण
जाण असते प्रत्येक जीवा
ओढ कशी ही जीवनाची
पुन्हा नव्याने जन्म हवा..................

स्वप्नातील "ती"


स्वप्नात येऊन हळूच
डोळ्यांत दडून जा
मी साद घालतो तुला
तू माझ्यात विरून जा
वाटलं स्वप्नांवर लिहावं काहीतरी
पण स्वप्नात तिच्याशिवाय कुणीच नाही
स्वप्नं तिचे नयन माझे
मन माझे घर तिचे
ती एक सुंदर कल्पना
अस्पष्ट चेहरा तिचा
शांत सोबत तिची
कोण आहे ती माहित नाही
पण नेहमीच भेटते ती मला
स्वप्नात,एकांतात
स्वप्नातील ती मला फार आवडते
तिचा सहवास हवाहवासा वाटतो
ती क्षणात दिपते अन क्षणात विझते
अशी का वागते
प्रश्न पडतो मग माझ्या मना ………..?
कळत नव्हते मजला
काय झाले तिला
स्वप्नात येऊन म्हणाली मला
सांग ना रे आवडते का मी तुला
मनाने होकार दिला
ओठांची कुजबुज झाली
कोवळे किरण डोळ्यांवर पडताच
कळले की सकाळ झाली.
कधी स्वप्नांच्या अंधारात
तर कधी वास्तवाच्या उजेडात
स्मरून जाते ती मला
जीव होतो मग पागोळ्यांगत
शोधत राहतो सदा तिला..............

निसर्ग आणि मन ......


नेहमीच हसत खेळत राहणारे मन
आज कोण जाणे कशाचे मौन बाळगत आहे
सूर्याचे किरणसुद्धा आज काळ्या ढगाआड
लपले आहे
कधी कधी मनाची आणि निसर्गाची व्यथा
एकच तर होत नसेल?
आसमंत पसरलेल्या निसर्गरम्य वातावरणात
आज वाऱ्याची साधी झुळुकही नाही
त्याचप्रमाणे मनही आज कुठतरी भरकटत आहे
कुठे,कशासाठी,कुणासाठी माहित नाही
बहुतेक निसर्गातील वातावरणामुळेच तर
ते व्यथित नसावे?
कळायला काहीच मार्ग नाही
कदाचित मागील काही विपरीत घडलेलं
आठवून मन स्वतःशीच उदास तर नसेल?
एका मनाची व्यथा दुसऱ्या मनाशिवाय
कोणीच जाणू शकत नाही
मन आणि निसर्ग,दोघेही मुके असतात
त्यांची मुकभाषा हि एकमेकांनाच कळत असावी
विस्तीर्ण वृक्षाची सावली उन्हाने कासावीस
झालेल्या मनाला शांती प्रदान करते
निसर्गातील निर्मल जल व्याकुळल्या मनाची
तहान भागवते
निसर्ग भरभराटीला आला कि
मनही आनंदून जाते
काय हेच ते नात आहे जे मन आणि निसर्ग
यात साम्य दर्शविते?
वडाच्या पारंब्या ज्याप्रमाणे एकाकी झुलत राहतात
त्याप्रमाणे मनाचेही तसेच होते
ते सुद्धा असेच एकाकी झुलत राहते
कोणाच्या येण्याच्या आशेने तर
कोणाच्या जाण्याच्या भीतीने
आसुसलेल्या मनाला कधी तरी एकोपा हवा असतो
कुठेतरी एकांतवासात मन फिरत राहते
निसर्गाच्या सानिद्ध्यात,पक्ष्यांच्या किलबिलाटात
कोणीतरी भेटून जात,कोणाचीतरी आठवण होते
कोणी बोलून जात तर कोणी अबोल
कोणी रडून जात तर कोणी रडवून जात
मनाच्या ह्या सगळ्या कृतीचा साक्षीदार असतो निसर्ग
त्याच्या सहवासात मन कधीच एकाकी नसते
फक्त त्याचा सहवास अनुभवायला हवा
एकाकी मनाला आपल्या मिठीत घेण्यासाठी
निसर्ग सदैव तत्पर असतो आणि जणू
साद घालीत असतो........

हे एकाकी मना,तुझे दु:ख पाहवेना
ये सानिद्ध्यात माझ्या,लुटुया निसर्गाची मजा
आज उघडून नयन,वाहुदे अश्रुधारा
वाट मोकळी कर सुखाची,विरुदे दु:खाची कला
वरद निसर्गाचा हा वर्षारुतू आला
धुऊन निघेल काळी छाया
भरभरून बरसेल निसर्गाची माया.

आज भेटशील का?


तू भेटली कि........
नवचैतन्य उफाळून येत
मी हरवून जातो तुझ्या चेहऱ्यावर
ती नजरांची देवाण-घेवाण
तुझ्या डोळ्यांचा मंद पण ज्वलंत इशारा
तुझ्या स्पर्शाने अंगावर येणारा शहारा
तुझी सोबत
मनमोहक वाटून जाते
मन हरपून जाणारा तुझा मोहक गंध
आजही तो गंध दरवळशील का.............
सांग ना आज भेटशील का ??????????

तू वेळेच्या आधी............
आणि मी नेहमीच उशिरा
तुझ्या डोळ्यांची झालेली आगपाखड
काय बोलू,काय नाही
अशी अवस्था झालेले तुझे ओठ
रागाने लालबुंद झालेला चेहरा
पण सगळ फक्त घटकेपुरताच
त्यानंतर एक घट्ट मिठी
आणि त्या मिठीत क्षणभर विश्रांती
आजही ती विश्रांती देशील का...........
सांग ना आज भेटशील का ???????????

तू नसली कि ..........
तुझी खूप आठवण येते
तुझ्या आठवणीने कंठ दाटून येतो
तुझ्या चेहऱ्यावरील निरागस भाव
तुझ्या ओठावरील स्मित हास्य
तुझ्या प्रेमळ गुजगोष्टी
तुझा राग-लोभ
एका भेटीसाठी मन व्याकुळ होत
तुझी कमतरता प्रकर्षाने जाणवते
आजही ती कमतरता भरून काढशील का ............
सांग ना आज भेटशील का????????????

विरह


तू गेली मला सोडून ढगांत
दैवाचे भाग्य आहे
विरह आला नशीबी
हे माझे दुर्भाग्य आहे

तुझी सावली घरात राहावी
म्हणून दिवा तेवत ठेवला आहे
साथ देत एका हुंदक्याची
काळीज माझं जळत आहे

साद घालता तुला कधी
नजर पडते दिव्यावरती
आठवणीच्या अंधारात मग
सांज बुडते क्षितिजावरती

तुझ्या दिव्याच्या उजेडात
आकाशाला जाग आली
रात्रभर जागून माझ्या डोळ्यांत
रात्रीलाही आता झोप आली

अनुबंध.........


पहिली भेट............
ती मला चीत-परिचित
मीही तिला कदाचित
पहिली मिठी...........
अगदीच अनुचित
ती माझ्या कवेत
थिजलेला चेहरा तिचा
झुकलेली तिची नजर
शरीराचा कंप तिच्या
माझी सुटती पकड
काहीतरी बोलण्यासाठी ओठांची चाललेली धडपड
आणि इकडे मात्र ह्रीदायाची धडधड
अविरत भावना
ती संथ,ती मृदू
जणू नदीचा प्रवाह
तिचे पाणावलेले डोळे
मी तुझीच आहे असा डोळ्यातील भाव
कि माझा असलेला समज
ती एक सुंदर कळी न उमलेली
पण सगळ्याच कळ्यांना अधिकार असतो
उमलण्याचा,फुलण्याचा
हे दर्शवणारी तिची मंद कृती
फुले,पाने मनोहर एकांत अवती-भोवती
ती रूपवान,ती सौंदर्यवान
हिरव्या झाडाचं कोवळ पान
तिच्या सौंदर्यावर काय लिहू मी काविता
कविताही लाजली तिची पाहून सुंदरता
पहिली भेट,पहिलं नात
पहिल्या नात्याचा,पहिलाच बंध
अनुबंध................

स्मरण


रम्य ही पहाट
फुललेली रानवट
तुझे झाले स्मरण
स्थिरावले सारे क्षण
मग हरपून भान
मन झाले गं उधाण.........
रूप गोजिरे सोनेरी
कुरवाळ सांभाळून
प्रतिबिंब देखणे
निहारतो दर्पण.............
सूर्याचे किरण
छेडी गवाक्षातून
दैवाची नवलाई
दिसे तुझ्या रूपातून................
गुलाबी लज्जा ही
थिजे नाजूक मुखावर
जशी सरिता वाहते
समावाण्या सरोवर.............
साधे वागणे असे
जणू वासरू गाईचं
प्रेम ओथंबून वाहते
ओठांतील शब्दातून ...........